सावरकरांच्या हिंदुत्वावर आरएसएसने कावेबाजपणे मारला डला
‘द विक’ या इंग्रजी नियतकालिकाने सावरकरांवर विशेषांक काढला आहे. निरंजन टकले यांनी लिहिलेला ‘द लॅम्ब लॉयनाईज्ड’ या शीर्षकाचा मुख्य लेख आणि इतर काही लेख त्यात आहेत. भाजपाचे राज्यसभा सदस्य तरुण विजय यांचाही एक लेख अंकात आहे. ‘द लॅम्ब लॉयनाईज्ड’ या शीर्षकाचा स्वैर अनुवाद ‘सिंह म्हणून सादर करण्यात आलेली एक भित्री शेळी’ असा करता येईल. सावरकरांना झालेली काळ््या पाण्याची शिक्षा, त्यानंतर त्यांनी माफीसाठी इंग्रजांकडे वेळोवेळी केलेले विनंती अर्ज, सरकारने त्यांना माफी देऊन केलेली सुटका आणि त्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारसाठी केलेले कार्य, असा सारा वृत्तांत या लेखात आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा मुख्य हात होता, हा जीवनलाल कपूर आयोगाने काढलेला निष्कर्षही टकले यांनी लेखात विस्ताराने चर्चिला आहे. टकले यांच्या लेखात नवे असे काही नाही. या सर्व बाबी या आधीही अनेक वेळा माध्यमांतून आलेल्या आहेत. वाजपेयी सरकारने सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावले तेव्हा या सर्व बाबींवर विस्ताराने चर्चा झाली होती. सावरकरांच्या जीवनात अनेक तेजस्वी घटना आहेत, तसे काही कच्चे दुवेही आहेत. सावरकर विरोधक त्यांच्या माफीनाम्याला तसेच नंतर त्यांनी ब्रिटिशांसाठी केलेल्या कामाला हायलाईट करीत राहतात. त्यावर उपाय न चालल्यामुळे सावरकरवादी या सत्य घटनाचा नाकारित राहतात. सावरकरांच्या चरित्रातील सत्य घटना नाकारल्यामुळे सावरकरांच्या जीवन चरित्रावरील काळी छाया आणखी गडद होते, हे सावरकर भक्तांना कळत नाही. ते आपला खोटेपणा रेटत राहतात. या गदारोळात सावरकरांचे योग्य मूल्यमापन झालेच नाही.विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्या कुटुंबियांसमवेतचे छायाचित्र. डावीकडून नारायण सावरकर, गणेश उपाख्य बाबाराव सावकर आणि विनायक सावरकर. |
हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी निर्माण केला. त्याची नीट व्याख्या केली. हिंदुत्वाला राजकीय महत्त्वही मिळवून दिले. तथापि, नंतरच्या काळात आपली सगळी शक्ती त्यांनी महात्मा गांधी यांना विरोध करण्यातच खर्ची घातली. त्यातून गांधी हत्या झाली आणि सावरकर व सावरकरवाद्यांचे राजकारण कायमचे संपले. राष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेमके याच्या उलट केले. गांधींच्या धोरणांना विरोध असला तरी, उघड विरोध करण्याचे धोरण आरएसएसने स्वीकारले नाही. उलट महात्मा गांधी यांना आपल्या प्रात: स्मरणीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिले. याचा परिणाम असा झाला की, बदनामीचा डाग सावरकर आणि हिंदु महासभेवर आला तर त्यातून राजकीय लाभ रूपी फळ मात्र आरएसएसला मिळाले.
सावरकरांचा हिंदुत्ववाद पळवून आरएसएसने संपूर्ण भारतावर ताबा मिळविला आहे, ही बाब प्रत्यक्ष हिंदुमहासभेचे नेते आणि सावरकरवादी विचारवंत यांच्या अजूनही लक्षात आलेली नाही. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर आरएसएसने त्याच्यापासून स्वत:ला दूर केले. नथुरामचा आरएसएसशी काहीही संबंध नाही, असे आरएसएसच्या वतीने जाहीर करण्यात आले. हा धोरणीपणा हिंदू महासभेला दाखविता आला नाही. महात्मा गांधी यांची हत्या होऊन आता ७0 वर्षे होत आलेली आहेत, तरीही हिंदू महासभेचे लोक सुधारायला तयार नाहीत. मोदी सरकार सत्तेवर येताच नथुराम गोडसेचे पुतळे उभारण्याची भाषा हिंदू महासभेचे नेते करीत आहेत. या मागणीपासूनही आरएसएसने लगेच स्वत:ला दूर केले आहे. मा. गो. वैद्य यांनी खास निवेदन काढून नथुरामचे पुतळे उभारण्याच्या मागणीला विरोध केला. या पासून तरी हिंदू महासभा आणि सावरकरवाद्यांनी काही बोध घ्यायला हवा.
No comments:
Post a Comment