Showing posts with label अटलबिहारी वाजपेयी. Show all posts
Showing posts with label अटलबिहारी वाजपेयी. Show all posts

Friday, 17 August 2018

वाईट पक्षात ढोंगी माणूस

अटलबिहारी वाजपेयी यांचे वर्णन करताना मीडिया "वाईट पक्षात चांगला माणूस" असे विशेषण वापरतो. पण ते बिलकूल खरे नाही. अगदी साफ खोटे आहे. वाजपेयी यांचे योग्य वर्णन करायचे झाल्यास "वाईट पक्षात ढोंगी माणूस" असे करावे लागेल. 

अयोध्या प्रकरण
भाजपाचा कथिल पुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यासाठी आंदोलन सुरू केले, तेव्हा वाजपेयी या आंदोलनापासून दूर राहिले. या आंदोलनाला वाजपेयींचा विरोध आहे, असा संदेश देशात जावा यासाठी हे नाटक करण्यात आले. या आंदालनाची परीणती अयोध्येतील मशिद पडण्यात झाली. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी यांनी अडवाणी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. बाबरी मशीदविराधी आंदोलनाला वाजपेयींचा खरेच विरोध होता, तर वाजपेयींनी या आंदोलनाला जाहीर विरोध करायला हवा होता. तसेच अडवाणींनासुद्धा जाहीर समज द्यायला हवी होती. पण तसे काहीही झाले नाही. उलट वाजपेयी हे अडवाणींच्या रथावर स्वार झाले. अयोध्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन पुढे वाजपेयी या देशाचे पंतप्रधानही बनले. 


टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन
वार्ताहर कृष्णकुमार सिंग


अयोध्येकडे निघालेली लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडविण्याचे धाडस तेव्हाचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दाखविले. अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये आली तोपर्यंत संपूर्ण देशातील वातावरण तापलेले होते. बिहारातही तीच स्थिती होती. अडवाणी समस्तीपूर येथील सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. संघोटे (संघोटे म्हणजे संघवाले. माझे स्नेही रविन्द्र तहकिक यांनी या शब्दाची निर्मिती केली आहे. लंगोटे तसे संघोटे.) रस्त्यावर उतरून धिन्गाणा घालित होते. जळते टायर फेकत होते. अल्पसंख्याक समाजही विरोध करीत होता. वातावरण अत्यंत प्रक्षोभक बनले होते. अशा स्थितीत लालूंनी अडवाणींच्या अटकेचे आदेश दिले. २३ ऑक्टोबर १९९० रोजी पहाटे कथिल पुरुषास अटक करण्यात आली तसेच ताबडतोब हेलिकॉप्टरद्वारे मासन जोरे येथे हलविण्यात आले. मासन जोरे शहर आता झारखंडमध्ये आहे. तेव्हा झारखंड राज्याची निर्मिती झालेली नव्हती. हा भाग बिहारातच होता. विशेष म्हणजे अडवाणी यांची रथयात्रा अडविण्यासाठी आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही मोठी भूमिका बजावली होती. अडवाणी यांना अटक करण्यासाठी नितीशकुमार हे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिन्ग यांच्यावर सतत दबाव टाकीत होते. अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर चांगला प्रकाश टाकला आहे. (निवृत्त झालेले सिन्ग हे आता ब्लॉग लिहितात. त्याची लिंक अशी आहे : http://kksingh1.blogspot.com/)

गुजरात दंगल
वाजपेयींचे मोठेपण सांगण्यासाठी मीडियावाले दुसरे उदाहरण गुजरात दंगलीचे देतात. गोध्रा कांडानंतर उसळलेल्या मुस्लिमविरोधी दंगलीत ३ हजारांपेक्षाही जास्त मुस्लिमांना ठार मारण्यात आले. ही दंगल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच पुरस्कृत केली होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी! जनाच्या लाजं काजं वाजपेयी यांनी गुजरातच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. ४ एप्रिल २००० रोजी त्यांनी अहमदाबादेतील शाह आलम भागातील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. या छावणीत दंगलीमुळे घरदार सोडावे लागलेल्या मुस्लिमांना ठेवण्यात आलेले होते. या छावणीला भेट दिली तेव्हा वाजपेयी म्हणाले : "माझी मान शरमेने खाली झुकली आहे. हजारो लोकांना आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले आहे. मी लवकरच काही मुस्लिम देशांचा दौरा करणार आहे. तेथे गेल्यानंतर मला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, हे मला माहीत नाही." याच दौ-यात वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, "राजधर्म का पालन करो. राजा के लिए प्रजा-प्रजा मे कोई भेदभाव नही होना चाहीए." वाजपेयींचे हे वाक्य फारच गाजले. वाजपेयी कसे चांगले आहेत, हे सांगण्याची मीडियामध्ये जोरदार स्पर्धा लागली. पण प्रश्न असा आहे की, स्वत: वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन केले का? गुजरातमधील दंगलग्रस्त मुस्लिमांना न्याय दिला का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ठार मारण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल वाजपेयींना खरेच कळवळा होता, तर वाजपेयी यांनी सर्वप्रथम मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हाकलायला पाहिजे होते. इतकेच नव्हे, तर गुजरातेत राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. पण यातले काहीही त्यांनी केले नाही. गुजराती मुस्लिमांना आजही न्याय मिळाला नाही. वाजपेयींनी ठरविले असते, तर मुस्लिमांना न्याय नक्की मिळाला असता. पण वाजपेयी नेहमीप्रमाणे ढोंगीपणाने वागले. नुसतेच बोलले. केले काही नाही. 

वाजपेयींनी भाजपा का सोडला नाही?
वाजपेयींचा बाबरी मशीद पाडण्यास विरोध होता. वाजपेयींचा गुजरात दंगलीला विरोध होता, हे एक वेळ खरे मानून चालू या! हे खरे मानले, तर मग प्रश्न असा पडतो की, वाजपेयी आयुष्यभर भाजपात का राहिले? बाबरी मशीद पाडल्यामुळे देशाची मानसिक फाळणी झाली. दंगलींचा आगडोंब उसळला. दहशतवादाला वाढावा मिळाला. गुजरात दंगलींनी देशाच्या कपाळावर अमानुषतेचा कलंक लागला. या घटनांनी कोणताही सुहृदय माणूस हेलावून गेला असता. वाजपेयी हेलावले असते, तर त्यांनी त्याचक्षणी भाजपाला राम राम ठोकला असता. पण वाजपेयी बुडाला डिन्क लावल्याप्रमाणे खुर्चीला घट्ट चिकटून राहिले. 

वाजपेयी यांचा हा सर्व दांभिकपणा सुरू असताना अत्रे असते तर काय झाले असते? अत्रे म्हणाले असते : अरे हा कसला अटल बिहारी हा तर अट्टल ढोंगी आहे. याच्यासारखा ढोंगी माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढील १० हजार वर्षांत होणार नाही.