Tuesday, 29 May 2018

गोमांतकीय मराठा समाज

ज्ञानेश परब
दीनानाथ मंगेशकर कुटुंबीय हे 'गोमांतकीय मराठा समाजा'तील आहे. या समाजाला कोकणात 'देवळी किंवा बंदे मराठा' असेही काही ठिकाणी म्हटले जाते.
गोवा/गोमंतक, कारवार, तळकोकण/सिंधुदुर्ग, बेळगाव आदी भागात देवदासी किंवा भाविणी असतात. या भाविणी म्हणजे देवाला वाहिलेल्या स्त्रिया असतात. यांचे लग्न ग्रामदेवळातील देव शंकराशी म्हणजे मंगेशाशी होते. आणि मग त्या गावातील कोणत्याही प्रतिष्ठित, सधन संपत्ती असलेल्या पुरुषाचे अंगवस्त्र म्हणून राहतात.
त्या भविणींना या प्रतिष्ठित पुरुषापासून जी संतती होते, त्या संततीच्या शिक्षणाची, पालनपोषणाची नि भाविणीच्या आयुष्यभर पालनपोषणाची जबाबदारी शेवटपर्यत त्या पुरुषाला करायची असते. फक्त त्या पुरुषाशी त्या भाविणीला लग्न करता येत नाही. तसेच त्या पुरुषाच्या संपत्तीत तिची मुले स्वतःचा हक्क/वाटा मागू शकत नाहीत. तो मात्र त्या पुरुषाच्या अधिकृत बायको आणि तिच्या मुलांना वारस म्हणून मिळतो.
या भाविणीच्या मुलांपासून झालेला समाज म्हणजे 'गोमंतक मराठा समाज'
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अभिनय करणारे, तसेच भारतीय/उत्तर हिंदुस्थानी संगीतात गाणारे बरेच लोक या समाजाचे आहेत. वानगी दाखल हंसा वाडकर, शांता हुबळीकर, जयश्री कामुर्लीकर(व्ही. शांताराम यांची दुसरी पत्नी/राजश्रीची आई), जयश्री गडकर, शोभा गुर्टू, मंगेशकर कुटुंबीय, पद्मिनी कोल्हापुरे, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर वगैरे.....
मला हे सर्व सांगायचे कारण म्हणजे माझ्या या गावात लहानपणापासून मी या भाविणी म्हणजे कलावंतिणी बघितल्या आहेत. तिथे एका गावात जवळपास चारपाच भाविणी असायच्या. त्या त्या गावात तेथील समाजानुसार त्यांची वाटणी झालेली असायची. बहुतेक भाविणी आणि त्यांची मुले त्यांचे संपूर्ण नाव लिहिताना स्वतःचे नाव, त्यांच्या गावाचे नाव आणि त्यापुढे 'कर' असे लिहून आडनाव लिहितात. जसे मंगेशकर, वाडकर, कोरगावकर, शिरोडकर, आरोंदेकर वगैरे.....
त्या अधिकृतरीत्या त्या गावातील ग्रामदेवतांची सेवा करतात. त्यांना थेटपणे कोणीही इतर पुरुष वाईट दृष्टिकोनातून बघत नाहीत. यात एक महत्वाचे म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठित पुरुषाच्या अंगवस्त्र असतात म्हणून. थोडक्यात त्या सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्ती असतात.
त्यांना तसा गावातील वाड्यांमध्ये मानही असतो. एखाद्याला मुलं झाले, बारसे असेल, कोणाच्या घरी लग्न असले, गृहप्रवेश कार्यक्रम असला, समारंभ असला, कोठल्यातरी उपक्रमाचे उदघाटन वगैरे असले कि त्यांना खास निमंत्रण दिले जाते. त्यांची सवाष्णिकडून साडी-खण-नारळाने ओटी भरली जाते. त्यांची पूजा केली जाते. आम्हां सर्व लहान मुलांना त्यावेळी त्यांच्या पाया पडावे लागायचे.
मला लहानपणाचे आठवतेय ते आमच्या परबांची अधिकृत भावीण(म्हणजे आमच्या परबांपैकी एक प्रमुख परब शेठ यांनी तिचे पालनपोषण केले होते) रत्नाबाई भावीण आमच्याकडे लहानपणी यायची. ती शिकलेली होती. शाळेत सातवीपर्यंत गेलेली होती. मी तिला रत्ना आजी म्हणायचो. ती फार प्रेमळ होती. मला भरभरून आशीर्वाद द्यायची.
तिने शिरोड्याला मिठाच्या सत्याग्रहात स्वयंसेवक म्हणून काम केले होते. त्यांच्या इतर गाण्यांबरोबर तिला त्यावेळची स्वातंत्र्यसैनिकांची गाणीसुद्धा पाठ होती. तिचा आवाज, गळा गोड होता. दिसायला सुंदर होती.
गावातील तो ऐपतदार पुरुष स्वतःच्या कुटुंबाबरोबर या भाविणीच्या कुटुंबाला पोसत असतो. यांना 'कलावंतीण' एव्हढ्याकरिता म्हटले जाते कारण यांच्या अंगात संगीत, शास्त्रीय गाणे, शास्त्रीय नृत्य, वेगवेगळ्या प्रकारच्या कला, चांगले सुग्रास जेवण करणे, आपल्या पुरुषाचे सर्व प्रकारचे लाड पुरवणे वगैरे उपजत गुण असतात. किंबहुना त्यांना या गोष्टींचे परंपरागत शिक्षण दिले जाते.
अर्थात हे पुरुषसत्ताक पद्धतीतील केवळ पुरुषांचे वर्चस्व जोपासण्याकरिता आणि समाजातील उच्चवर्गीय, केवळ ठराविक पुरुषांना सेवा मिळावी याकरिता केले जायचे.
या भाविणीला/स्त्रीला जर एकच मुलगी झाली तर तिला पुढे हाच भाविणीचा पेशा पत्करावा लागायचा. आणि जास्त मुली असतील तर त्यातील एखादी भावीण बनायची आणि बाकीच्यांची लग्ने व्हायची. तसेच जर मुलगा झाला असेल तर तो पुढे दुसरी कोठल्याही एका भाविणीच्या भावीण न झालेल्या मुलीशी लग्न करायचा. अशा पद्धतीने गेली चारशे पाचशे वर्षे येथे असा हा समाज तयार झाला आहे.
या भाविणीना संभाळणारे पुरुष हे बहुतेक सारस्वत समाजातील सधन ब्राह्णण, मराठा सरदार, जमीनदार, किंवा वैश्य समाजातील व्यापारी या समाजातील आणि गावातील प्रतिष्ठित असे समजले जाणारे गावकार/भाटकार असे असतात. त्यामुळे या समाजात शिक्षणाने समृद्ध, कलावंत आणि खाऊन पिऊन सुखी असलेले लोक भरपूर आहेत.
पण दुर्दैवाने त्यांना म्हणावी तशी सामाजिक प्रतिष्ठा त्या गावात लाभत नाही. पुढे यांच्यातील बरेच लोक मुंबई, पुणे, बडोदा, इंदूर, सांगली, कोल्हापूर येथे स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे नाव मोठे केले.
भाविणीने जर या रुढितून बंडखोरी करून अधिकृतरीत्या लग्न केले तर देव मंगेशाचा कोप होऊ शकतो आणि तिचा वंश किंवा तिचा अधिकृत नवरा मरू शकतो असा तेथील लोकांमध्ये गैरसमज/अंधश्रद्धा आहे.
तुम्ही सर्वानी जयवंत दळवी यांची 'महानंदा' हि कादंबरी वाचली असेल.
तुम्हांला अजून जास्त माहिती हवी असेल तर जयवंत दळवी यांची 'महानंदा' हि कादंबरी वाचा किंवा त्यावर आधारित चित्रपट किंवा त्यावर आधारित नाटक 'गुंतता हृदय हे' बघा.
जयवंत दळवी हे आरवली या गावातील सारस्वत समाजातील सधन कुटुंबातील. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण हे त्या गावाशेजारील दुसरे मोठे प्रसिद्ध गाव शिरोड्यातील ट्युटोरियल हायस्कुल (सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर येथेच पंचवीस वर्षे शिक्षक आणि मुख्याध्यापक होते) येथे झाले नंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले.
माझे आजोळ शिरोड्याचे आणि माझे गाव आरोंदा. हि आरोंदा, शिरोडा, रेडी, कन्याळ, आरवली, आजगाव, तिरोडा, नाणोस हि जवळपासची पंचक्रोशीतील तळकोंकणातील गावे. त्यात आरोंदा आणि रेडी हि महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील गावे.
एक मात्र खरे या भविणींना त्याकाळी तशी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. पण आज म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांत भावीण हि प्रथा हळूहळू कमी होत चाललीय. आणि हा मुळातच सर्वच बाबतीत(पैसे, शिक्षण, उद्योग, राजकारण) इतर समाजापेक्षा पुढे असलेला हा गोमंतकीय मराठा समाज सुद्धा अजून प्रगतिशील होत चाललाय हि एक चांगली गोष्ट आहे.
पण त्या समाजातील काही सेलिब्रिटीज(सर्व नव्हे) मात्र आपापली रूट्स/मुळे विसरून आपल्या पूर्वजांना (भाविणीना आणि त्यांच्या मुलबाळांना) तत्कालीन हिंदू वर्णवर्चस्ववादी समाजाकडून झालेल्या अपमानाचा विसर पडत, तेच सेलिब्रिटीज कडवे हिंदू किंवा ब्राह्मणवादी/वर्णवादी बनत चाललेय हि मात्र मोठी खंत आहे.

टीप: या लेखाची प्रेरणा आपले येथील सर्वांचे आवडते मित्र, सामाजिक जाणीव असलेले लेखक, आंबेडकरी विचारवंत श्री. मिलिंद धुमाळे यांच्या एका पोस्टवरून.
( Dnyanesh Parab यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

No comments:

Post a Comment