आचार्य विराज सूर्यकांत
एका गावात एक भिकारी राहत होता. अनेक वर्षे तो भीक मागून खात असे अन् गावाच्या मंदिराच्या पारावर झोपत असे.
एक दिवस एक जाणकार संन्यासी प्रवास करीत असताना त्या गावात आला. भिकाऱ्याला पाहताच त्याला धक्का बसला. भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर राजयोग होता. खरे तर तो राजा व्हायला हवा होता. पण तो भीक मागत होता. संन्याशाने खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कारण सापडलेच नाही. क्षणभर त्याला वाटले, आपली विद्या चुकीची असावी, नाही तर शरिरावर राजचिन्हे असलेला माणूस असा भीक का मागेल?
तो संन्यासी आपल्या पुढील प्रवासावर जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे म्हणून तो मंदिरात गेला. तर त्याला पारावर भिकारी झोपलेला दिसला. भिकाऱ्याने झोपेत दोन्ही पायांची अढी घातलेली होती. संन्याश्याने त्याच्या जवळच्या दंडाने भिकाऱ्याच्या पायावर जोरदार प्रहार केला. प्रहार इतका जोरात होता की, भिकाऱ्याचे दोन्ही पाय जखमी झाले.
भिकारी ओरडून उठला आणि संन्याशाशी भांडू लागला. संन्याशी त्याला म्हणाला, ‘तुझ्या शरिरावर राजचिन्हे आहेत. तू इतक्या दिवसांत राजा व्हायला हवा होतास. पण, पायाची अढी घालून झोपतोस, म्हणून तुझा राजयोग अडकून पडलाय.’ भिकाऱ्याला विश्वास बसला नाही. पण एक झाले, पाय जखमी झाल्यामुळे त्याला झोपताना पायांची अढी घालता येईना. अढी घालण्याची सवय असल्यामुळे त्याला झोपही येईना. तो रात्रभर जागाच राहिला.
त्या राज्याचा राजा मध्यरात्री एकटाच मंदिरात येऊन पुजा करून जात असे. त्या रात्रीही राजा पुजा करायला आला. त्याचवेळी राजाच्या शत्रूंनी त्याला मारण्याचा कट रचलेला होता. काही मारेकऱ्यांनी राजावर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात पारावर झोपलेला भिकारी जागाच होता. त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने झटकन पुढे होऊन राजाला वाचविले. राजाचे प्राण वाचले. खुष झालेल्या राजाने त्याला आपले अर्धे राज्य आणि राजकन्या भिकाऱ्याला दिली. आणि त्याचा राजयोग सिद्ध झाला.
Moral Of The Story : अज्ञानामुळे आपल्या भाग्याची दारे बंद होतात. जाणते ती आपल्यासाठी उघडू शकतात