लेखक/संपादक/संकलक : विराज शांताराम

Tuesday 23 February 2016

ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त हिंदू होते

ख्रिश्चन धमार्चे संस्थापक येशू ख्रिस्त तामिळ हिंदू होते असा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर हे विनायक सावरकरांचे ज्येष्ठ बंधू असून आरएसएसच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी १४६ साली ‘ख्रिस्त परिचय’ हे पुस्तक लिहिले होते. त्यात हा दावा करण्यात आला आहे. येशू हे तामिळी ब्राह्मण होते. त्यांचे नाव केशव कृष्ण होते, असे गणेश सावरकरांनी या पुस्तकात म्हटले आहे. गणेश सावरकरांचा हा दावा हिंदू धर्मियांची दिशाभूल करणारा आहे. येशू ख्रिस्त हे हिंदू होते, हे खरे आहे. तथापि, ते ब्राह्मण नव्हे, तर मराठा होते.  त्याचे खरे नाव यशवंत होते. त्या काळी आजच्या सारखी आडनावे लावण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे येशू यांचे घराणे आडनावाच्या जागी क्षत्रिय असे उपनाम लावीत असे. छोट्या यशवंतला प्रेमाने येशू म्हटले जाई. त्यांच्या नावाचे हे लघुरूपच सर्वत्र प्रचलित झाले. तसेच ‘क्षत्रिय’चा अपभ्रंश ख्राईस्ट, ख्रिस्त असा झाला.

मुंबईतील एक ट्रस्ट गणेश दामोदर सावरकरांनी लिहिलेलं 'ख्रिस्त परिचय' पुस्तक पुन्हा प्रकाशित करीत आहे. या पुस्तकात येशू ख्रिस्त जन्माने विश्वकर्मा ब्राम्हण होते. तसंच ख्रिश्चन धर्म हा हिंदू धमार्चाच एक संप्रदाय आहे, ख्रिश्चन असा वेगळा धर्म नव्हता असा दावा करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर यांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त यांचा जन्म कुठे झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. गणेश दामोदर सावरकर यांनी येशूविषयी केलेले दावे पुढील प्रमाणे आहेत.

  • १. पॅलेस्टिन आणि अरब प्रदेश हिंदूंचाच होता आणि येशू ख्रिस्त प्रवास करत भारतात पोहोचले होते जिथे त्यांनी योगाचं शिक्षण घेतलं. 
  • २. येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असून त्यांच खरं नाव केशव कृष्ण होतं. तामिळ त्यांची मातृभाषा होती आणि त्यांचा रंग तामिळ लोकांप्रमाणे गडद होता. 
  • ३. येशू ख्रिस्त यांच्या 12व्या वर्षी मंदिरात ब्राम्हण परंपरेप्रमाणे त्यांची पवित्र मुंज करण्यात आली होती. 
  • ४. पॅलेस्टीन तसेच आजूबाजुच्या प्रदेशात राहणारे लोक येशू ख्रिस्त यांना शंकर, विष्णुचा अवतार मानित असत.
  • ५. ख्रिश्चन धमार्चा पवित्र ग्रंथ बायबल ही येशू ख्रिस्त यांची शिकवण नसल्याचा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी केला आहे. 

गणेश दामोदर सावरकर यांनी येशू यांचा इतिहास लिहिताना अनेक खोट्या गोष्टी रेटल्या आहेत. त्यांनी मांडलेला इतिहास कसा खोटा आहे, हे वरील ५ मुद्यांच्या बाबतीत तपशीलवार पाहू या :

  • १. येशू यांचा जन्म पॅलेस्टिनमध्ये नव्हे, तर महाराष्ट्रातील आताच्या फलटण येथे झाला. फलटणचे प्राचीन नाव फलस्तान (फळे देणारे ठिकाण) असे होते. येशू यांनी धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर जगभर भ्रमंती केली. व शेवटी ते अरब प्रदेश तसेच आजच्या इस्रायल, पॅलेस्टिन या भागात स्थिरावले. आपल्या जन्भूमीची आठवण म्हणून त्यांनी या भागाला फलस्तान असे नाव दिले. त्याचा अपभ्रंश होऊन पॅलेस्टिन झाले. आज हेच नाव रूढ असून, ते महाराष्ट्रातील फलटणची आठवण जागविणारेच आहे. 
  • २. गणेश दामोदर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे येशू काळ्या रंगाचे तमिळी असते, तर  इस्रायल, पॅलेस्टिनमधील गो-या लोकांनी त्यांचा स्वीकार केलाच नसता. तसेच त्यांचे नाव नाव केशव कृष्ण असते, तर त्यांना येशू का म्हटले गेले असते? याचे उत्तर सावरकर देत नाहीत. 
  • ३. येशू यांची १२ वर्षी परंपरेप्रमाणे मुंज झाली असती, तर त्यांच्या गळ्यात जाणवे असते. तथापि, त्याचा कोठेही उल्लेख येत नाही. उलट येशू यांना मुकूट घातल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. त्यांना वधस्तंभावर चढविण्यात आले तेव्हाही, त्यांना काटेरी मुकूट घालण्यात आला होता. मुकूट घालण्याची प्रथा राजघराण्यात असते. येशू यांचा उल्लेख बायबलमध्ये ‘यहुद्यांचा राजा’ असाच येतो. त्यावरून ते राजघराण्यातील होते, हे सिद्ध होते. येशू हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध यादव वंशातील होते.  ‘यादव’चे 'यावद' व पुढे 'याहुद', 'यहुदा' असे रूप झाले. 
  • ४. फलस्तान म्हणजेच आजच्या पॅलेस्टिनच्या आजूबाजूच्या प्रदेशात राहणारे लोक येशू यांना भगवान शंकराचा अवतार मानून महेश असेही संबोधित असत. महेशचा अपभ्रंश होऊन महीस, मसीह अशी रुपे तयार झाली. त्यातूनच त्यांना येशू मसीह हे नाव मिळाले. मराठा समाज प्राचीन काळापासूनच शंकराचा उपासक राहिला आहे. मराठेशाहीची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शंकराच्या पिंडीवरच शपथ घेतली होती. हे येथे उल्लेखनीय होय.
  • ५. बायबलमधील शिकवण ही येशूचीच शिकवण आहे. त्या काळी महाराष्ट्रातील प्रचलित असलेल्या गोष्टीच येशू यांनी बायबलमध्ये सांगितल्या आहेत. 

1 comment:

  1. इसारवाडी-इस्राएल

    ReplyDelete